सोमनाथ सोमेश्वर मंदिर, करंजे, बारामती

नीरा – बारामती रस्त्यावरील करंजेपूल गावापासून ५ किलोमीटर अंतरावर उत्तरेला, तर पुणे बारामती रस्त्यावरील मोरागावापासून पंधरा किलोमीटर अंतरावर दक्षिणेला श्री क्षेत्र करंजे येथे सोमेश्वर मंदिर वसले आहे. येथील स्वयंभू लिंगाचे दर्शन घेणेसाठी श्रावण महिन्यात आणि महाशिवरात्रीला राज्यभरातून लाखो लोक गर्दी करतात. गुजरात सौराष्ट्र सीमेवरील सोरटी सोमनाथ हे सोमनाथाचे प्रतिरूप मानले जाते. सतीचा वान हा प्रसिद्ध मराठी चित्रपट येथील कथेवर बेतला आहे. करंजे येथे मालुबाई नावाची शिवभक्त स्त्री नांदत होती.सासूच्या जाचामुळे रात्रीच्या वेळी ओढ्याखाली जाऊन वाळूची पिंड तयार करून ती शंकराची भक्ती करायची. तीच्या इच्छेखातर गुजरातचा सोरटी सोमनाथ सोमेश्वर येथे प्रकट झाला अशी कथा सांगितली जाते. तेव्हापासून हे सोमेश्वरचे ठाण बनले आहे. माळवाडी येथे अजूनही ओढ्याकाठी मालूबाईचे छोटे मंदिर आहे. मंदिर प्राचीन काळापासून अस्तित्वात असले तरी बांधकाम यादवकालीन असल्याचे म्हंटले जाते. मात्र ते पेशवेकालीन असावे, असे मत इतिहासतज्ञ व्यक्त करतात. मंदिरात तीर्थाची बारव खऱ्या खोट्या शपथांसाठी प्रसिद्ध आहे. आजच्या संगणक युगाच्या काळातही सोमेश्वर मंदिराच्या बारवेत कोरलेल्या नागराजासमोर बसून खरे खोटे करण्यासाठी राज्यभरातून लोक येतात. श्रावणात सर्प स्वरुपात सोमनाथ प्रकटतात, अशीही येथील भाविकांची समजूत आहे. सोमवारी काकड आरतीला महिनाभर लोक उपस्थित असतात.